
दुर्मीळ पारंपरिक गावरान वाणांच्या बियाणांचे जतन करणाऱ्या ‘सीड मदर‘ राहीबाई सोमा पोपेरे यांना यंदाचा पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या या बिजमातेच्या ‘देशी बियाण्यांच्या बॅंकेत’ आज ५४ पिकांचे ११६ जातींचे वाण आहेत. बीबीसीने २०१८ मध्ये जाहीर केलेल्या १०० प्रभावशाली महिलांमध्ये त्यांचा समावेश आहे.
संकरित बियाणांचा प्रचंड वापर वाढलेला असताना राहीबाई पोपरे यांनी देशी आणि पारंपरिक बियाणांचं संकलन करत बियाणांची बँक तयार केली. लहानपणापासूनच बियाणे गोळा करण्याचा छंद जडलेल्या राहीबाई पोपेरे यांनी देशी वाणांच्या बियाणांच पारंपरिक पद्धतीनं सवर्धनं केलं. विशेष म्हणजे प्रत्येक बियाणाविषयीची माहिती राहीबाईंना तोंडपाठ आहे. बियाणे औषधी आहे का, त्याचा उपयोग काय, त्याची वैशिष्ट्ये कोणती हे सगळे त्या सांगतात. त्यामुळे त्यांना बियाणांचा चालताबोलता ज्ञानकोश असेही म्हणता येईल.
देशी बियाणं गोळा करून महाराष्ट्रात शेती संवर्धानाचं मोठे काम उभे करणाऱ्या राहीबाई पोपेरे यांनी संकटांवर मात करून ही ‘बीज बँक‘ उभारली आहे. आता या कामाची केंद्र सरकारने दखल घेतली आहे. देशात अनेक प्रकारचे पिकांचे वाण उपलब्ध आहेत. परंतु हरिततक्रांती नंतर देशात संकरित (हायब्रीड) बियाणांचा पुरवठा मोठया प्रमाणात होऊ लागला. भरमसाठ उत्पादनामुळे शेतकरी हायब्रीड बियाणांकडे वळले आणि पारंपारिक, गावरान वाणांच्या वापराकडे, जतनाकडे दुर्लक्ष झाले. अशा पारंपारिक आणि गावरान वाणांचे जतन “सीडमदर” राहीबाई करत आहेत.

राहीबाई या निरक्षर असल्या तरी ज्ञानाने समृद्ध आहेत, निसर्गाच्या शाळेत त्या खूप काही शिकल्या आहेत. राहिबाईच्या आजूबाजूच्या परिसरातील बहुतांश शेतकरी आजही पारंपारिक देशी वाणाचे बियाणे वापरूनच शेती करतो. सुरुवातीच्या काळात राहीबाईना हे काम करताना अनेकांनी वेड्यात काढलं. सुरुवातीला अनेक लोकांकडून त्यांना अनेक प्रकारची बोलणी ऐकावी लागली पण त्यांनी मार्ग सोडला नाही. त्यांच्या घराभोवती असणाऱ्या अडीच तीन एकर परिसरात विविध प्रकारची चारशे-पाचशे झाडे आज उभी आहेत. त्यांचे घर म्हणजे एक प्रकारचे संशोधन केंद्रच आहे.
त्या म्हणतात देशी वाणांच धान्य हे केवळ पावसाच्या पाण्यावर येतं; या बियाण्याला कोणतेही रासायनिक खत व पाणी देण्याची आवश्यकता नाही. राहीबाईंच्या बियाणे बँकेतील बियाणे आज राज्याच्या विविध भागात पोहोचले आहेत. गावरान बियाणे संवर्धन प्रचार व प्रसार यामध्ये केलेल्या भरीव कार्यासाठी यापूर्वी त्यांना कृषी विभागाने आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. त्यांना आतापर्यंत अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत, मात्र आता मिळालेल्या पद्मश्री पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याची केंद्र सरकारनेही दखल घेतली असून कृषी क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.