फोर्ब्स ३० अंडर ३० मध्ये भारतॲग्री!

“नेटवर्क १८”चा भाग असलेल्या फोर्ब्स इंडियाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या ( Forbes India 30 Under 30) ३० अंडर ३० या मानाच्या यादीमध्ये भारतॲग्रीचे संस्थापक संचालक सई गोळे आणि सिद्धार्थ दियालानी या दोघांचा समावेश करण्यात आला आहे. २०११ पासून ही यादी प्रसिद्ध होत असून अनेक कसोट्या पार करून यातील नावे निवडण्यात येतात. नुकतेच १ लाख डाउनलोडचा टप्पा पूर्ण केलेल्या भारतॲग्रीच्या शिरपेचात आता हा आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. 

 

लहान वयात विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या व्यक्तींची यादी फोर्ब्स इंडिया जाहीर करते. यामध्ये ३० हून कमी वयाच्या व्यक्तींनी केलेली कामगिरी आणि त्याचा पर्यावरणाला व समाजाला होणारा उपयोग लक्षात घेऊन नामांकन दिले जाते. यंदाच्या यादीत भारतॲग्रीला स्थान मिळाले असून यानिमित्ताने भारतॲग्रीची विश्वासार्हता आणि भारतॲग्रीच्या सेवांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

सई यांनी फोर्ब्स इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आयआयटी मद्रासमध्ये विद्यार्थी फावल्या वेळात लोकांच्या रोजच्या जीवनातील समस्यांवर उपाय शोधण्यासाठी काम करत असतात; आम्हीही असाच एक प्रयत्न केला. सई यांचे कुटूंब गेल्या ३० वर्षांपासून शेती करत असल्याने त्यातील अडचणी त्यांना जवळून माहित होत्या. या दोघांनी त्यांच्या तंत्रज्ञानाच्या माहितीचा वापर करून या अडचणी सोडविण्याचा निर्णय घेतला.

 

फोर्ब्स इंडिया या वार्षिक नियतकालिकात (मॅगझिन) भारतॲग्रीचे संस्थापक संचालक सई गोळे आणि सिद्धार्थ दियालानी या दोघांच्या कार्याची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. या दोघांनी पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर सुमारे वर्षभर बाहेर काम केले. परंतु, कोणतीही गोष्ट स्वतः अनुभवल्याशिवाय समजत नाही म्हणूनच त्यांनी पुण्याजवळील एका शेतात राहून शेतकऱ्यांच्या समस्या आणि सत्यपरिस्थिती समजून घेतली. 

 

शास्त्रीय ज्ञान नसल्यामुळे भारतीय शेतकऱ्याचे मिळकतीचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. शेतकऱ्यांना व्यक्तिगत (personalized) मार्गदर्शनाची गरज असल्याचे लक्षात आल्यानंतर या दोघांनी मिळून २०१७ मध्ये लीनॲग्री सध्याची भारतॲग्री ही कंपनी उभी केली. याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्याकडून घेतलेल्या विविध माहितीच्या आधारे रीतसर मार्गदर्शन आणि पीक वेळापत्रक देण्यास सुरुवात करण्यात आली. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी सर्वतोपरी मदत करताना त्याच्या शेतात कोणते पीक घेतले पाहिजे इथपासून ते पाणी, खते आदींच्या व्यवस्थापनापर्यंत आणि अगदी पीक काढणीपर्यंत मार्गदर्शन दिले जाते.

मागच्या वर्षी जुलैमध्ये भारतॲग्रीचे मोबाईल ॲप तब्बल ५ भाषांत वितरित करण्यात आले होते, नुकतेच ॲपचे १ लाख डाउनलोड पूर्ण झाले असून तब्बल २५ हजार शेतकरी भारतॲग्रीची सशुल्क सेवा वापरत आहेत. कृषी माहितीच्या आधारे प्रत्यक्ष आर्थिक उलाढालीतून उत्पन्न मिळवून देणारी भारतॲग्री ही भारतातील पहिली कंपनी असल्याचा दावा असल्याचेही फोर्ब्स इंडियाने या लेखात म्हटले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *