शेतकरी कर्जमाफीचे निकष काय?

 

नव्या सरकारने नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच “महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019” जाहीर केली आणि शेतकऱ्याच्या आनंदाला पारावार उरला नाही! नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली; शुक्रवारी (27 डिसेंबर) राज्य सरकारनं शेतकरी कर्जमाफीचा शासन निर्णय जारी केला आहे. पण ही कर्जमाफी कोणाला मिळणार त्याचे निकष काय याबाबत अनेक शेतकऱ्यांमध्ये अजूनही स्पष्टता दिसून आलेली नाही. चला तर मग पाहूया काय आहेत या कर्जमाफीसाठीचे निकष… 

कर्जमाफीचे निकष – 

 • 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 दरम्यान कर्ज घेतलेल्या आणि ते 30 सप्टेंबर 2019पर्यंत थकबाकी मिळून 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज असलेले शेतकरी. 
 • 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 दरम्यान कर्ज घेऊन त्याचं पुनर्गठन केलेले आणि ते 30 सप्टेंबर 2019पर्यंत 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज थकित असलेले शेतकरी. 
 • कर्जबाजारी शेतकऱ्याकडे किती जमीन आहे (अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक) याचा विचार केला जाणार नाही.
 • कुटुंब नव्हे तर वैयक्तिक शेतकरी हा एकक ग्राह्य धरण्यात आला आहे. प्रति शेतकरी कमाल 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ केलं जाणार आहे. 
 • 30 सप्टेंबर 2019 रोजी शेतकऱ्यावरील कर्जाच्या थकबाकीची रक्कम 2 लाख रुपयांहून अधिक असल्यास त्याचं कर्ज माफ होणार नाही.
 • राष्ट्रीयीकृत बँका, व्यापारी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, सेवा सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना दिलेलं कर्जही माफ होईल.

पुढील शेतकऱ्यांना लाभ होणार नाही…

 • राज्यातील आजी किंवा माजी मंत्री किंवा राज्यमंत्री, लोकसभा किंवा राज्यसभा सदस्य, विधानसभा किंवा विधानपरिषद सदस्य. 
 • 25 हजार रुपयांपेक्षा जास्त मासिक वेतन असलेले केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी. (चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून)
 • 25 हजार रुपयांपेक्षा जास्त मासिक वेतन असलेले केंद्र आणि राज्य शासनाचे सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी. (महावितरण, एसटी महामंडळ आदी)
 • शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती. 
 • 25 हजार रुपयांपेक्षा जास्त मासिक वेतन असलेल्या निवृत्त व्यक्ती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *