निर्मला सीतारामन यांनी वर्ष 2020-21 साठीचा अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात कररचना अर्थात टॅक्सस्लॅबमध्ये बदल करण्यात आले आहेत. पूर्वी 3 टॅक्सस्लॅब होते, त्यामध्ये फोड करुन आता 6 टॅक्सस्लॅब केले आहेत. याशिवाय यंदा शिक्षण, कृषी, आरोग्य यासारख्या योजनांवर भर देण्यात आला आहे. कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली असून शेतकऱ्यांसाठी १६ कलमी कार्यक्रम आखण्यात आला आहे.
2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं म्हणत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली. देशातील शेतकऱ्यांची सध्याची आर्थिक स्थिती आणि आगामी काळात शेतकऱ्यांसाठीच्या योजना, तरतूद याबाबत माहिती देत त्यांनी अर्थसंकल्पाची सुरुवात केली. यावेळी शेती आणि शेतीविषयक कामांसाठी 2.83 लाख कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.
ही आहेत १६ कलमे
1) देशभरातील 20 लाख शेतकऱ्यांना सौर उर्जेवर चालणारे पंप दिले जाणार आहेत. तसेच, 15 लाख शेतकऱ्यांच्या ग्रीड पंपांना सौर उर्जेशी जोडले जाईल. प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा उत्थान महाअभियान (PM KUSUM) या योजनेअंतर्गत कृषी पंपांना सौर उर्जेशी जोडण्याचा निर्धार केंद्र सरकारने केला आहे.
2) जलसंकटाला सामोरे जाणाऱ्या 100 जिल्ह्यांना चिंतामुक्त करण्याचा निर्धार केंद्र सरकारने व्यक्त केला आहे. त्यासाठी विशेष योजना केंद्र सरकार आणणार असून, यामुळे या जिल्ह्यातील शेतीला पाणी उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
3) मासे, फळं, भाजीपाला इत्यादी नाशवंत माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नुकसान न होता नेता यावा आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाची वाहतूक तातडीनं व्हावी, यासाठी ‘किसान रेल’ सुरू केली जाणार आहे. या ‘किसान रेल’मध्ये रेफ्रिजेटर असलेले कोच असतील.
4) मासेमारीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘सागर मित्र योजना’ सुरू केली जाणार असून, या माध्यमातून मासेमारीचं उत्पादन 200 लाख टन करण्याचे उद्दिष्ट आहे.
5) शेती आणि शेतीशी निगडित क्षेत्रांवर आगामी आर्थिक वर्षात 2.83 लाख कोटी रुपयांची तरतूद केली जाईल. शेती, सिंचन, ग्रामविकास आणि पंचायती राज यासाठी ही तरतूद असेल.
6) शेतकऱ्यांसाठी 15 लाख कोटींच्या कर्जाची तरतूद करत असल्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आहे. तसेच, शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत दीन दयाल योजनेअंतर्गत वाढवली जाईल.
7) जलजीवन मिशनची सुरुवात गेल्यावर्षी केंद्र सरकारने केली होती. या मिशनसाठी यंदाच्या अर्थसंकल्पातून 3.6 लाख कोटींची तरतूद केली आहे.
8) नाशवंत मालासाठी ‘कृषी उड्डाण’ योजना सुरू केली जाईल. तसेच ही योजना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मार्गावर सुरु करणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे.

9) 2025 पर्यंत दूध उत्पादन दुप्पट करण्याचे केंद्राचे लक्ष्य आहे. दूध उत्पादकांसाठी सरकारकडून लवकरच खास योजना आणण्यात येणार आहे.
10) ‘एक जिल्हा एक उत्पादन’ अशा समूह योजनांवर शेतकऱ्यांच्या संख्येनुसार भर दिला जाणार आहे.
11) देशात आणखी वेअर हाऊस आणि कोल्ड स्टोरेज बांधण्यासाठी PPP मॉडेल अवलंबले जाईल. वेअर हाऊस आणि कोल्ड स्टोरेज नाबार्ड आपल्या हाती घेऊन नव्या पद्धतीने त्यांचा विकास करेल.
12) महिला शेतकऱ्यांसाठी ‘धन्य लक्ष्मी’ योजना आणली जाईल. बियाण्यांशी संबंधित योजनांमध्ये महिलांना प्रामुख्याने जोडले जाईल. तसेच, या योजनेतून महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आहे.
13) सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून ऑनलाईन मार्केट वाढविले जाईल. झिरो बजेट शेतीवरही भर दिला जाईल.
14) मनरेगा अंतर्गत चारा छावण्यांना जोडलं जाईल.
15) मॉडर्न ॲग्रीकल्चर लँड ॲक्ट राज्य सरकारांकडून लागू करण्यात येईल.
16) शेती खतांचा संतुलित वापर व्हावा म्हणून शेतकऱ्यांना शेतीतील खतांच्या वापराची माहिती दिली जाईल.